२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘युएफबीयु’चा संप; एटीएम, यूपीआय, इंटरनेट व मोबाइल बँकिंगचा वापर करण्याचे आवाहन
मुंबई : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी संपाच्या कालावधीत होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाचे बँकिंग व्यवहार संप सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपाच्या काळात अत्यावश्यक बँकिंग सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असले, तरी बँकेच्या नियमित शाखा सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी रोख रकमेची आवश्यकता असल्यास एटीएम तसेच एडब्ल्यूएमचा (ADWM) वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ग्राहक सेवा केंद्रे (CSP), इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, YONO, UPI आणि अन्य डिजिटल बँकिंग सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः धनादेश, रोख व्यवहार, महत्त्वाची देयके तसेच इतर तातडीचे बँकिंग व्यवहार २८ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घेणे ग्राहकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना संपाच्या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करत, संभाव्य गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून ग्राहकांच्या सहकार्याबद्दल आणि समजूतदारपणाबद्दल आभार मानले आहेत.
ग्राहकांच्या सोयीसाठी रविवारीही एसबीआयच्या शाखा सुरू
ग्राहकांच्या सोयीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) शाखा येत्या रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू राहणार आहेत. ग्राहकांनी आपल्या आवश्यक बँकिंग व्यवहारांसाठी जवळच्या एसबीआय शाखेला भेट द्यावी, असे आवाहन भारतीय स्टेट बॅंककडून करण्यात आले आहे.


Comment here