विशेष वार्ता

औषधांच्या गोळीपासून आरोग्याच्या हमीपर्यंत… फार्मासिस्टची भूमिका गेमचेंजर’!

‘सुदृढ भविष्याकरिता फार्मासिस्टचे सक्षमीकरण’

डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध रुग्णापर्यंत पोहोचते आणि त्याचा योग्य वापर होतो, यामागे असतो तो औषधांचा तज्ज्ञ—’औषधनिर्माता’ म्हणजेच फार्मासिस्ट! मात्र आजही समाजातील अनेकांना फार्मासिस्टची भूमिका केवळ मेडिकलमधून औषध देण्यापुरतीच मर्यादित वाटते. बदलत्या आरोग्यव्यवस्थेत ही धारणा आता बदलण्याची वेळ आली आहे.

२५ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनने FIP ही जगभरातील ५.५ दशलक्षांहून अधिक फार्मासिस्ट, फार्मसी शिक्षक आणि फार्मसी क्षेत्रातील वैज्ञानिकांचे प्रतिनिधित्व करणारी जागतिक संस्था आहे. (FIP) २०२६ ची संकल्पना “सुदृढ भविष्याकरिता फार्मासिस्टचे सक्षमीकरण” अशी जाहीर गेली केली आहे. याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि त्यातील संसर्गजन्य आजार, मानसिक आरोग्य, दीर्घकालीन आजार, आरोग्यव्यवस्था आणि वातावरणाशी संबंधित आरोग्य आव्हानांच्या पार्श्वभूमीवर फार्मासिस्टना अधिक कौशल्य, मान्यता आणि आरोग्यव्यवस्थेत प्रभावी भूमिका देण्याची गरज FIP ने अधोरेखित केली आहे.

गावापासून ग्लोबल हेल्थपर्यंत

गावातील मेडिकलपासून मोठ्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयापर्यंत फार्मासिस्ट आरोग्यसेवेतील महत्त्वाचा दुवा आहे. औषधाची योग्य मात्रा, सेवनाची पद्धत, औषधांचे दुष्परिणाम, औषध-औषध परस्पर प्रतिक्रिया, साठवणूक आणि उपचारातील सातत्य याबाबत रुग्णाला मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण काम फार्मासिस्ट करतो. रुग्णालयात फार्मसिस्ट, डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधून औषधोपचार अधिक सुरक्षित व परिणामकारक करण्यासाठी काम करतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांमध्ये रुग्ण समुपदेशन, औषधांचे नियमित सेवन, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि औषधांचा सुरक्षित वापर यामध्येही फार्मासिस्टचे योगदान वाढत आहे.

औषधनिर्मितीपासून संशोधनापर्यंत मोठी जबाबदारी

फार्मासिस्टची भूमिका केवळ रुग्णालय किंवा मेडिकलपुरती मर्यादित नाही. औषधांचे उत्पादन, फॉर्म्युलेशन, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, क्वॉलिटी कंट्रोल, रेग्युलेटरी अफेयर्स, क्लिनिकल रिसर्च, फार्माकोविजिलांस, मेडिकल कोडिंग, मेडिकल स्क्राईब, ड्रग सेफ्टी, ड्रग डेव्हलपमेंट आणि औषध वितरण अशा विविध क्षेत्रांत फार्मसिस्ट कार्यरत आहेत. भारत हा जगातील महत्त्वाचा औषधनिर्मिती केंद्र म्हणून ओळखला जात असताना कुशल फार्मासिस्टची गरजही सातत्याने वाढत आहे. सरकारच्या नॅशनल हेल्थ प्रोफाइल २०२३ नुसार १ मार्च २०२३ रोजी भारतात १७,१३,७३० नोंदणीकृत फार्मासिस्ट होते. महाराष्ट्रात ही संख्या ३,५५,३२९ इतकी होती. तरीही आज फार्मासिस्टसाठी संधींचे क्षितिज भारतापुरते मर्यादित राहिलेले नाही. जागतिक स्तरावरही फार्मसिस्टचे महत्त्व वाढत आहे. औषध निर्माणावर आधारित क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्याधारित मनुष्यबळाला महत्त्व मिळत आहे.

एआयच्या युगात फार्मासिस्टची नवी भूमिका

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात (AI) मुळे आरोग्यसेवेचे स्वरूप वेगाने बदलत आहे. औषधांची माहिती शोधणे, रुग्णाच्या औषधोपचारातील संभाव्य समस्या ओळखणे, औषध-औषध परस्परप्रतिक्रिया अंदाज घेणे, औषधनिर्मिती व संशोधनाला गती देणे या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता फार्मसिस्टसाठी प्रभावी साधन ठरत आहे. मात्र एआय हा फार्मासिस्टचा पर्याय नसून त्याचा बुद्धिमान सहकारी आहे. एआय कडून मिळालेल्या माहितीची वैज्ञानिक पडताळणी करणे, रुग्णाची वैयक्तिक परिस्थिती समजून घेणे, योग्य औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करणे आणि रुग्णाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही जबाबदारी फार्मासिस्टचीच राहते.

भविष्यात एआय आणि फार्मासिस्ट हे समीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. “एआय माहिती देऊ शकते; पण रुग्णकेंद्रित निर्णयाला मानवी फार्मासिस्टची कौशल्यपूर्ण भूमिका आवश्यक आहे.” “थेंबे थेंबे तळे साचे” या म्हणीप्रमाणे योग्य औषध, योग्य माहिती आणि योग्य वेळी मिळणारे मार्गदर्शन यांची सांगड घातली तर निरोगी समाजाची भक्कम पायाभरणी होऊ शकते. म्हणूनच या जागतिक फार्मासिस्ट दिनाचा संदेश स्पष्ट आहे— “फार्मासिस्टला सक्षम करा; आरोग्यव्यवस्थेला सक्षम करा!”

प्रा.डॉ.निखिल निळकंठ जाधव

(लेखक गुरूकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे विभाग प्रमुख आहेत तथा मेंबर ऑफ वर्ल्ड ह्युमन राईट प्रोटेक्शन कमिशन आहेत.)

Comment here