आपला जिल्हा

माजलगावात ‘आरोग्य सप्ताह’; आठ गावांत मोफत आरोग्य तपासणीचा उपक्रम

नाडी परीक्षणासह बीपी, शुगर, ईसीजी, फिजिओथेरपी व विविध आजारांचे निदान; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

माजलगाव : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि युवासंत चंद्रकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने माजलगाव तालुक्यात १ ते ८ ऑक्टोबरदरम्यान ‘आरोग्य सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात आठ गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी, नाडी परीक्षण व सर्व रोग निदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना विविध आरोग्य सेवांचा लाभ मोफत मिळणार आहे.

आरोग्य सप्ताहांतर्गत दिग्रस, जहागीरमोहा, हिंगणी, सिरसाळा, भोगलवाडी, देवदहिफळ, आमला आणि उमरा या गावांमध्ये अनुक्रमे आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये वात, कफ, पित्त, रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, फिजिओथेरपी, पादाभ्यंग, शिरोधारा, सांधेदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, कान-नाक-घसा विकार, जुनाट सर्दी, पोटदुखी तसेच महिलांच्या विविध आजारांची तपासणी व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रकारच्या कर्करोगाबाबतही तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी व आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी व गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी केले आहे.

Comment here