आपला जिल्हा

मंत्री पंकजा मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

अनियमित पावसाचा फटका; शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत साधला संवाद

माजलगाव : तालुक्यातील नित्रुड येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी शेतकरी पांडुरंग जाधव यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. अनियमित पावसामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतीवर झालेला परिणाम, सोयाबीनची सद्यस्थिती आणि उत्पादनातील संभाव्य घट याबाबत त्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.

नित्रुड, पात्रुड व जायकवाडी फाटा परिसरातील शेतकऱ्यांना यंदा पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी पांडुरंग जाधव यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करून पिकाची वाढ, उत्पादनाची स्थिती आणि शेतीसमोरील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

पावसाअभावी तसेच अनियमित पावसामुळे सोयाबीन उत्पादनावर झालेला परिणाम, दुष्काळी परिस्थिती आणि शेतीतील विविध अडचणींबाबत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मंत्री मुंडे यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली. यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य अरुण राऊत, माजी नगराध्यक्ष डॉ.अशोक तिडके, माधव निर्मळ, ज्ञानेश्वर मेंडके, रुपाली कचरे, डॉ.अभिजित सोळंके, विनायक रत्नपारखी, नितीन नाईकनवरे, संजय आंधळे, दीपक मेंडके यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment here