आपला जिल्हा

धरणाची उंची वाढविण्यापेक्षा बॅरेजेस उभारून सिंचनाचा प्रश्न सोडवा!

मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे नितीन नाईकनवरे यांची मागणी; माजलगाव-वडवणी भागातील सिंचनवाढीसाठी ६ बॅरेजेस व २ उपसा जलसिंचन योजनांचा प्रस्ताव

 

माजलगाव : माजलगाव व वडवणी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याऐवजी विविध नद्यांवर बॅरेजेस उभारण्याचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. धरणाची उंची वाढविल्यास केवळ १.२५ टीएमसी पाणीसाठा वाढणार असून मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी बाधित होणार आहेत. त्याऐवजी त्याच किंवा त्यापेक्षा कमी खर्चात सुमारे ५ ते ६ टीएमसी सिंचनवाढ साध्य होऊ शकते, असा दावा माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन देऊन बॅरेजेसच्या सर्वेक्षणासह व्यवहार्य योजनांना मंजुरी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे.

सरस्वती नदीवर दिंद्रुड, उमरी व कोथरूळ येथे बॅरेजेस, तर सिंदफणा नदीवरील ढेपेगाव व सांडस चिंचोली येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच कुंडलिका नदीवरील राजेगाव व कुप्पा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांचेही बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजलगाव तालुक्यातील लोणी सांगवी व ढालेगाव या बॅरेजेसमध्ये सुमारे १८ किलोमीटरचे अंतर असून, या पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांना जानेवारीनंतर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीवर पुरुषोत्तमपुरी, मंजरथ व गुंजथडी येथे आणखी तीन बॅरेजेस उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पात्रुड-नित्रुड परिसरात एक आणि तालखेड परिसरात एक उपसा जलसिंचन योजना राबविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

“या सर्व प्रस्तावित योजनांचा तातडीने सर्वे करून ज्या योजना तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य (फिजिबल) ठरतील, त्यांना मंजुरी मिळवून देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नाईकनवरे यांनी केली आहे. सर्वप्रथम सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही नाईकनवरे यांनी विनंती केली आहे.”

– नितीन नाईकनवरे

माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, माजलगाव, जि.बीड

Comment here