पणजी, गोवा : महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर आता गोवा राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथे या कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना मांडणारे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती होती. त्यामुळे गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांचा आर्थिक भार पेलणे कठीण असलेल्या गोव्यातील गरजू रूग्णांना मोठा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळत आहे. याच यशस्वी उपक्रमाच्या धर्तीवर गोवा राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्यात आला असून, मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते या कक्षाचे लोकार्पण संपन्न झाले.
या ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे मूळ संकल्पक तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोवा राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गोवा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या उपक्रमाला मंजुरी मिळाली आणि आता या संकल्पनेचे प्रत्यक्षात रूपांतर झाले आहे.
गंभीर आजारांचे उपचार दिवसेंदिवस महाग होत असताना आर्थिक परिस्थितीअभावी अनेक रुग्णांना उपचार घेणे कठीण जाते. अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी हा मोठा आधार ठरतो. महाराष्ट्रातील या उपक्रमाच्या यशस्वी कार्यपद्धतीच्या धर्तीवर गोव्यात स्वतंत्र वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू झाल्याने आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहण्याची वेळ येणाऱ्या रूग्णांना आता मदतीचा नवा आधार मिळणार आहे.
महाराष्ट्रात रुजलेली ‘गरजू रुग्णांची सेवा’ ही संकल्पना आता गोव्यातही पोहोचली असून, मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा उपक्रम गोव्यातील अनेक गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देण्याच्या कार्याला गोव्यातही नवे बळ मिळाले आहे. महाराष्ट्रात सुरू झालेली ही सेवाभावी संकल्पना आता गोव्यात साकार झाल्याने रुग्णसेवेच्या कार्याला राज्याच्या सीमा ओलांडून व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

मंगेश चिवटे यांच्याकडून १ लाख रूपयांचा धनादेश
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मंगेश चिवटे यांच्यातर्फे गोवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. गोवा राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून ही मदत देण्यात आली.
२०१५ मध्ये मांडलेली संकल्पना आता गोव्यात साकार
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी १७ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. महाराष्ट्रात या योजनेला मोठे यश मिळाल्यानंतर ही सेवाभावी संकल्पना इतर राज्यांमध्येही पोहोचावी, यासाठी चिवटे सातत्याने प्रयत्नशील आहेत.



Comment here