महामार्गावरील खड्डा ठरला मृत्यूचा सापळा
माजलगाव : खामगाव-पंढरपूर पालखी महामार्गावरील रस्त्याच्या सदोष कामामुळे आणि कंत्राटदाराच्या कथित निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघातात पाच निष्पाप तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे कार उडून समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. या दुर्घटनेप्रकरणी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कंत्राटदारासह संबंधित अभियंत्यावर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव-पंढरपूर पालखी महामार्गावरील रस्त्याच्या कामातील कथित हलगर्जीपणा पाच तरुणांच्या जीवावर बेतला. शिंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे कार उडून समोरून येणाऱ्या एसटी बसवर जोरदार आदळली. या भीषण अपघातात कारमधील पाचही तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कंत्राटदारासह संबंधित अभियंत्यावर माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी सुमारे १०.५० वाजता हा भीषण अपघात झाला. तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जाणारे तरुण हुंडाई आय-२० कारने (MH 26 AK 4210) प्रवास करत होते. माजलगाव हद्दीतील शिंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे कारला अचानक उसळी मिळाली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसला (MH 20 BL 2740) कारची जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की कारमधील पाचही तरुणांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
या दुर्घटनेत ओंकार महादेव गिरी (वय २०), गजानन महादेव नामदास (वय ३५), समर्थ गजानन नामदास (वय १२), ऋतिक मोतीलाल बडे (वय १८) आणि अनिल आचार्य (वय ४०) यांचा मृत्यू झाला. या घटनेने माजलगाव परिसरावर शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये प्रशासन व संबंधित कंत्राटदाराच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह
या अपघातानंतर खामगाव-पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्याचे बांधकाम करताना ठेकेदाराने निष्काळजीपणे ठेवलेले खड्डे, चढ-उतार आणि रस्त्यावर पडलेल्या भेगा यामुळेच अपघात घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही पुरेशी काळजी न घेता रस्त्याचे काम करण्यात आल्याने हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी ज्ञानेश्वर महादेव गिरी (वय २६, रा.शिंपेटाकळी, माजलगाव) यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षकांकडे
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र अंभोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. विकासकामांच्या नावाखाली प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार कंत्राटदारांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
एका खड्ड्याने पाच कुटुंबांचा आधार हिरावला
महामार्गावरील रस्त्याची सुरक्षितता आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत असताना या अपघाताने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. एका खड्ड्यामुळे पाच जणांचा जीव गेल्याने प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गाची तातडीने पाहणी व दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



Comment here