महा-राष्ट्र

मुख्यमंत्री वैद्यकीय अर्जावरील तालुका अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा मार्ग मोकळा

ग्रामीण भागातील रूग्णांची स्वाक्षरीसाठी फरफट थांबणार; शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाठपुराव्याला यश

गडहिंग्लज : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्जाच्या प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सकांना अधिकार होते. मात्र, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांमधून येणाऱ्या रूग्णांचा आता वेळ आणि पैसा वाचणार आहे. अर्जावर स्वाक्षरीचे अधिकार तालुका अधीक्षकांना देण्यात आले आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज गडहिंग्लज येथील शंभर खाट उपजिल्हा रूग्णालयात भेट दिली. आणि स्वाक्षरीचा प्रश्न मार्गी लावला. राज्य शासनामार्फत प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या अर्जाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी अधिकार दिले होते. मात्र योग्य मार्गदर्शन तत्वे नसल्यामुळे अर्जाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी होत नव्हती. हे लक्षात घेऊन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने आज गडहिंग्लज शंभर खाट उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात भेट घेऊन प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. चंद्रकांत खोत यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख राम राऊत यांनी मार्गदर्शन तत्वाबरोबरच ही सुविधा सुलभ कशी होईल, याबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुप्रिया देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावला. यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, आरोग्यदूत फाऊंडेशनचे बाबा देशमाने, भगीरथ तोडकरी, गडहिंग्लज तालुकाप्रमुख निलेश पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख अमोल पाटील, विभागप्रमुख धनश्री देसाई यांनी रूग्णासंदर्भात येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय संकपाळ, सागर कुऱ्हाडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Comment here