आपला जिल्हा

खाडेवाडी येथे ऊसतोड मजुराला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा नोंद

माजलगाव : तालुक्यातील खाडेवाडी शिवारात ऊसतोडीच्या कामावरून झालेल्या वादातून एका मजुरासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बालासाहेब वाघ (वय 28, रा.देवठाणा ता.धारूर, जि.बीड) हे गेल्या चार महिन्यांपासून खाडेवाडी येथील मुकादम श्रीकृष्ण खाडे यांच्याकडे पत्नी कोमल व लहान भाऊ हनुमंत यांच्यासह ऊसतोडीचे काम करत आहेत. दिनांक 11 मार्च रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास गब्बु खाडे या बागायतदाराच्या खाडेवाडी शिवारातील उसाच्या शेतात ते काम करत असताना गब्बु खाडे हे दारूच्या नशेत तेथे आले. उसाच्या व्हाढ्याला कांडी का ठेवली, असा जाब विचारत त्यांनी गणेश वाघ यांच्याशी वाद घालत चापटा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, तेथे उपस्थित असलेले मुकादम श्रीकृष्ण खाडे व त्यांचे नातेवाईक अजय वसंत खाडे हेही घटनास्थळी येऊन गणेश वाघ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

ही घटना पाहून गणेश वाघ यांची पत्नी कोमल व भाऊ हनुमंत हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांनाही तिघांनी चापटा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत फडातून बाहेर निघण्यास सांगितल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गब्बु खाडे, श्रीकृष्ण खाडे व अजय वसंत खाडे (रा.खाडेवाडी, ता.माजलगाव, जि.बीड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 352, 351(2), 351(3) व 3(5) अन्वये शिरसाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comment here