माजलगाव : निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत पसायदान पोदार लर्न स्कूल, माजलगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमांचे पूजन आणि इतिहासाच्या स्मरणातून विद्यार्थ्यांना मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाची प्रेरणादायी गाथा उलगडून सांगण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या गौरी दीक्षित, संचालक मंडळातील प्रियंका बागडे, लीना दुगड, खुशबू दुगड तसेच प्रमुख अतिथी वर्तमान माध्यम समुहाचे भगीरथ तोडकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शिक्षिका मंजुषा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास सविस्तरपणे समजावून सांगितला. निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याची मुक्तता करण्यासाठी झालेला संघर्ष, या लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, त्यांचा त्याग आणि बलिदान यांचा इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. या संघर्षामुळे स्वातंत्र्य, लोकशाही आणि राष्ट्रप्रेमाचे महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भगीरथ तोडकरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मराठवाडा मुक्ती संग्रामातील विविध महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी केलेल्या संघर्षाची जाणीव करून देत त्यांनी विद्यार्थ्यांनी देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठेची भावना मनात जपावी, असे आवाहन केले.
इतिहास केवळ पाठ्यपुस्तकात न राहता तो विद्यार्थ्यांच्या मनात जिवंत व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाची प्रेरणादायी गाथा समजली. देशभक्तीमय वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने करण्यात आली.




Comment here