आपला जिल्हा

गुरूकृपा महाविद्यालयात अष्टविनायकांचा भक्तिमय जागर

गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारला आठ पवित्र गणेशक्षेत्रांचा आकर्षक देखावा

माजलगाव : तालुक्यातील मालीपारगाव परिसरातील डॉ.यशवंत राजेभोसले संचलित गुरूकृपा महाविद्यालय येथे गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायकांच्या आठ पवित्र स्थानांचा आकर्षक आणि माहितीपूर्ण देखावा साकारण्यात आला आहे. गणरायाच्या विविध रूपांसह त्यांच्या मंदिरांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आल्याने हा देखावा विद्यार्थ्यांसह भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व असलेल्या अष्टविनायकांमध्ये श्री मयुरेश्वर (मोरगाव, पुणे), श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक, अहिल्यानगर), श्री बल्लाळेश्वर (पाली, रायगड), श्री वरदविनायक (महाड, रायगड), श्री चिंतामणी (थेऊर, पुणे), श्री गिरिजात्मज (लेण्याद्री, पुणे), श्री विघ्नेश्वर (ओझर, पुणे) आणि श्री महागणपती (रांजणगाव, पुणे) यांचा समावेश आहे. या सर्व गणेशक्षेत्रांची माहिती, मंदिरांची रचना आणि गणरायाच्या विविध रूपांचे दर्शन घडविणारा देखावा येथे साकारण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत श्री गणरायाच्या चरणी दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे. त्यामुळे महाविद्यालय परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची माहिती व्हावी, तसेच गणेशभक्तीबरोबरच आपल्या परंपरांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. हा देखावा साकारण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अमित बिंदू, सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी तसेच गुरूकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण परिवाराने परिश्रम घेतले.

गुरूकृपा महाविद्यालयात वर्तमान माध्यम समूहाचे संपादक भगीरथ तोडकरी यांच्या हस्ते बुधवारी श्री गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी तोडकरी यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करताना प्राचार्य अमित बिंदू, प्राध्यापक ऋषिकेश शेंडगे, निळकंठ जाधव आदी.

Comment here