माजलगाव : ठेवीदारांचा अढळ विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन या भक्कम त्रिसूत्रीच्या बळावर तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटने आर्थिक क्षेत्रातील आपली वाटचाल अधिक सक्षम केली आहे. संस्थेने १०८ कोटी रूपयांचा स्वनिधीसह यावर्षी १५.७४ कोटी रूपयांचा निव्वळ नफा आणि १,१९१ कोटी १८ लाख रूपयांचा एकूण व्यवसाय नोंदवत आर्थिक सक्षमतेचा भक्कम पाया अधोरेखित केला आहे. सभासदांच्या व्यवसायवृद्धीसाठी कर्जरूपाने आर्थिक पाठबळ देतानाच ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि नियोजनबद्ध व्यवसायवाढीला प्राधान्य देत संस्थेने सहकार क्षेत्रात विश्वासार्हतेची वाटचाल कायम ठेवली आहे.
तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २० सप्टेंबर रोजी संस्थेच्या माजलगाव येथील विभागीय कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आर्थिक वर्षातील संस्थेच्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडण्यात आला. यावेळी संस्थेने १० टक्के लाभांश देण्याची घोषणाही केली. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत शेजुळ होते. संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुमित शेंडगे यांनी सर्वसाधारण सभेतील विषयांचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक माहिती सभासद आणि उपस्थित मान्यवरांसमोर मांडली. सभेची सुरूवात दीपप्रज्वलन, आई तुळजाभवानी मातेची पूजा व आरतीने करण्यात आली. माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत तसेच संचालक मंडळ व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.
अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ म्हणाले, “ठेवीदारांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन या त्रिसूत्रीच्या बळावर तुळजाभवानी अर्बनची आर्थिक वाटचाल अधिक सक्षम करण्याचा निर्धार आहे. ठेवीदारांनी आपल्या कष्टाची कमाई संस्थेकडे विश्वासाने सोपविली असून, हा विश्वासच संस्थेची खरी ताकद आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण, निधीचा योग्य व नियोजनबद्ध वापर, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक व्यवहार यांना संस्थेने कायम सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.” आगामी काळातील संस्थेच्या उद्दिष्टांची माहिती देताना शेजुळ यांनी ३१ मार्च २०२७ अखेर सोनेतारण कर्ज व्यवसाय ३५० कोटी रूपयांच्या टप्प्यावर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यासोबतच संस्थेचा स्वनिधी अधिक भक्कम करून आर्थिक सुरक्षितता आणि सक्षमतेला आणखी बळ देण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आर्थिक प्रगती साधतानाच सामाजिक बांधिलकीची जपणूकही तितक्याच प्रभावीपणे केली जाईल. संस्थेला आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित, सक्षम आणि भक्कम करण्यासाठी भविष्यात नियोजनबद्ध पद्धतीने विविध उपाययोजना राबविल्या जातील,” असे शेजुळ यांनी सांगितले. आर्थिक प्रगतीसोबतच संस्थेची सामाजिक बांधिलकी अधिक व्यापक करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी काळात समाजातील गरजू घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासोबतच शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. “आर्थिक शिस्त, पारदर्शकता, सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत संस्थेला अधिक सक्षम आणि विश्वासार्ह उंचीवर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील,” असा विश्वास चंद्रकांत शेजुळ यांनी व्यक्त केला.

वार्षिक सभेत सभासदांनी संस्थेच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करत विविध विधायक सूचना, अपेक्षा आणि शुभेच्छा दिल्या. मुकुंद सोळंके यांनी संस्थेचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे सांगत सामाजिक बांधिलकी जपत संस्था विविध उपक्रम राबवत असल्याचे नमूद केले. गीताराम अनभुले यांनी तुळजाभवानी अर्बनचा नावलौकिक पारदर्शक आणि विश्वासार्ह व्यवहारातून निर्माण झाल्याचे सांगितले. सभासदांचा विश्वास संपादन करत संस्था सातत्याने प्रगती करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ.शिवाजी काकडे यांनी संस्थेच्या विविध सेवांचा सभासदांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सेवा अधिक गतीमान आणि सुलभ करण्यात आल्याचे नमूद करत शाखांमधील कर्मचारी सभासद व ग्राहकांशी आपुलकीने संवाद साधत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सुनिल खामकर यांनी अडचणीच्या काळात संस्थेने कर्जाच्या माध्यमातून तातडीने आर्थिक मदतीचा हात देत व्यवसायाला उभारी देण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे आभार मानले. राहुल कदम यांनी संस्था सभासदांसोबतच कर्मचारी वर्गाच्या हिताचाही विचार करीत असल्याचे सांगितले. सभासद आणि कर्मचारी या दोन्ही घटकांचा समतोल साधत संस्था कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी भविष्यात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली. सभासद अतुल तौर यांनी व्यवसायाच्या विस्तारासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या काळात तुळजाभवानी अर्बनने कर्जाच्या माध्यमातून पाठबळ दिल्याचा अनुभव मांडला. “संस्थेने दिलेल्या या आर्थिक सहकार्यामुळे व्यवसायाच्या विस्ताराला चालना मिळाली. योग्य वेळी मिळालेले हे पाठबळ आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले,” असे त्यांनी सांगितले.
एकूणच, आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार, ठेवीदारांचा विश्वास आणि सभासदकेंद्रित सेवा या आधारावर तुळजाभवानी अर्बनने आपली वाटचाल अधिक व्यापक करण्याचे संकेत वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले. आर्थिक सक्षमतेसोबत सामाजिक बांधिलकीची सांगड घालत भविष्यातील विकासाची दिशा निश्चित करण्यात आली असून, संस्थेच्या प्रगतीचा हा आलेख सभासदांच्या विश्वासाला अधिक बळ देणारा ठरत आहे.
सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदत
तुळजाभवानी अर्बनने सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. जम्मू-काश्मीर येथे २६ जानेवारी २०१७ रोजी हिमस्खलनात शहीद झालेले जवान विकास पांडुरंग समुद्रे यांच्या कुटुंबीयांना संस्थेच्या वतीने ५१ हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तसेच माजी सैनिक संघटना, माजलगाव यांना १ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील व्हॉलीबॉल संघाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आवश्यक व्हॉलीबॉल किट व ट्रॅकसूटसाठी ३२ हजार ५०० रूपयांची मदत करण्यात आली. या सामाजिक उपक्रमांमुळे संस्थेच्या आर्थिक वाटचालीसोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीवही अधोरेखित झाली. सभेच्या निमित्ताने उपस्थित सभासदांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यातही सभासदाभिमुख, पारदर्शक, आधुनिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य सुरू ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळातील सदस्य, अधिकारी, कर्मचारी, सभासद, ठेवीदार, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेची आर्थिक भरारी
तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना संस्थेच्या एकूण सभासदांची संख्या १ लाख १५ हजार असून, संस्थेच्या एकूण ठेवी ६७९ कोटी ५९ लाख, तर एकूण कर्जवाटप ५११ कोटी ५९ लाख रूपये आहे. संस्थेचे सोने तारण कर्ज २१२ कोटी ५५ लाख, गुंतवणूक २३७ कोटी १० लाख रूपये तर संस्थेकडे १०८ कोटी स्वनिधी रूपये असल्याची माहिती सभेत देण्यात आली. तुळजाभवानी अर्बनची यशस्वी घोडदौड संस्थेने आर्थिक वर्षात १५ कोटी ७४ लाख रूपयांचा नफा मिळवित संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्याचे सभेत नमूद करण्यात आले. या आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्र व पुण्यात विस्ताराचे धोरण
संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर देशमुख यांनी संस्थेच्या विस्ताराबाबत माहिती देताना पश्चिम महाराष्ट्र तसेच पुणे परिसरात नवीन शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती सभासदांना दिली. संस्थेच्या सेवा अधिक व्यापक करण्यासोबतच आधुनिक बँकिंग सुविधांच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देण्याचे संस्थेचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांनी संस्थेच्या मागील वाटचालीचा सविस्तर आढावा सभासदांसमोर मांडला. संस्थेने आतापर्यंत केलेल्या प्रगतीबरोबरच भविष्यातील ध्येयधोरणे व विस्ताराची दिशा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.








Comment here