माजलगाव : माजलगाव धरण परिसरात विनापरवाना विहीर खोदकाम व ब्लास्टिंग करून धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप करत संपादक सुभाष नाकलगावकर यांनी माजलगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संपादक नाकलगावकर यांनी केली आहे.
माजलगाव नगरपालिकेच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सुमारे ९१ कोटी रूपयांची योजना मंजूर झाली असून, या योजनेचे काम संतोष कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रा प्रा.लि., नांदेड या कंपनीला देण्यात आल्याचे सुभाष नाकलगावकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीच्या माध्यमातून माजलगाव धरण परिसरात विहीर व जॅकवेलच्या कामासाठी खोदकाम करताना आवश्यक परवानग्या न घेता मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धरणाच्या मुख्य भिंतीपासून सुमारे २०० मीटर अंतरावर अंदाजे ८० फूट खोल व ६० फूट रुंद विहीर खोदण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र सिंचन कायदा, १९७६ मधील कलम १०७ चे उल्लंघन झाल्याचे सुभाष नाकलगावकर यांनी म्हटले आहे.
विनापरवाना खोदकाम निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन उपविभागीय अभियंता प्रवीण चौगुले यांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी काम बंद करण्याबाबत नगरपालिकेला पत्र दिले होते, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही संबंधितांवर अपेक्षित कायदेशीर कारवाई झाली नसल्याचा आरोप नाकलगावकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी ७ जुलै व ७ ऑगस्ट २०२५ रोजीही निवेदने दिल्याचे सांगितले. तत्कालीन कार्यकारी अभियंता जयंत इनामदार व उपविभागीय अभियंता प्रवीण चौगुले यांनी प्रकरणाकडे दुर्लक्ष करून संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घातल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. विनापरवाना ब्लास्टिंगप्रकरणी संतोष मुरकुटे, तत्कालीन मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, तत्कालीन कार्यकारी अभियंता जयंत इनामदार आणि उपविभागीय अभियंता प्रविण चौगुले यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नाकलगावकर यांनी केली आहे.
आठ दिवसांपूर्वी निवेदन; कारवाईअभावी आंदोलन
या प्रकरणी आठ दिवसांपूर्वी निवेदन देऊनही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सुभाष नाकलगावकर यांनी म्हटले आहे. धरणाच्या सुरक्षेशी संबंधित हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या हिताचा असून, कथित ब्लास्टिंगप्रकरणी कायदेशीर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.




Comment here