आपला जिल्हा

ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक!

‘कोयता बंद, वाहतूक बंद, कारखाना बंद’चा ठराव

माजलगाव : ऊसाला प्रतिटन ५ हजार रुपये अंतिम भाव आणि ४ हजार २५० रुपये पहिली उचल द्यावी, या प्रमुख मागणीसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर माजलगाव येथे झालेल्या ऊस परिषदेत जोरदार चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास यंदाचा गळीत हंगाम रोखण्याचा निर्धार व्यक्त करत ‘कोयता बंद, वाहतूक बंद, कारखाना बंद’चा ठराव हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एकमताने मंजूर करण्यात आला.

माजलगाव येथील मोठ्या मैदानावर युवा शेतकरी संघर्ष समिती आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यासह परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी परिषदेला उपस्थित होते. ऊस दर, पहिली उचल, तोडणी व वाहतूक खर्च तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, औषधे, मजुरी, पाणी आणि वीज यांसह तोडणी व वाहतूक खर्चात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्या तुलनेत ऊसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना कारखानदारांकडून योग्य दर दिला जात नसल्याची भावना शेतकऱ्यांनी परिषदेत व्यक्त केली.

शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळेपर्यंत ऊसतोडणी कामगारांनी कोयते चालवू नयेत, ऊस वाहतूकदारांनी वाहतूक करू नये आणि साखर कारखान्यांनी गाळप सुरू करू नये, असा निर्धार ठरावाद्वारे व्यक्त करण्यात आला. ५ हजार रुपये अंतिम दर आणि ४ हजार २५० रुपये पहिली उचल मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

परिषदेला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख, भाई अॅड.नारायण गोले पाटील, भाई मोहन गुंड, दीपक लिपणे, अजय बुरांडे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, साखर कारखानदारीतील धोरणे आणि ऊस दरातील तफावतीवर प्रकाश टाकला.

Comment here